जसा पावसाळा सुरु होतो तसे सर्वांना वर्ष पर्यटनाचे वेध लागतात. पावसाळा सुरु झाला कि सहयाद्रीच्या डोंगररांगा जणू हिरवा शालू नेसलेल्या नव्या नवरीसारख्या देखण्या दिसतात; त्याचं डोंगरांवरून कोसळणारे असंख्य धबधबे सह्याद्रीच्या सौन्दर्यात अजूनच भर टाकतात !  ह्याच सह्याद्री मध्ये अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळयांच्या अफाट कर्तृत्वाची साक्ष म्हणून आजही उभे आहेत, त्या पैकीच एक किल्ला असलेला किल्ले- घनगडाची सफर करायची आम्ही ठरवले.

जुलै चा महिना सुरु झाला होता आणि पावसाळा आपल्या पूर्ण रंगात आला होता इकडे आमच्या ऑफिस मधील जनता काम करून करून पार वैतागली होती; काम करून वैतागलेल्या आमच्या ऑफिस मधल्या मित्रांना विश्रांतीची गरज भासू लागली. मग मी पुढाकार घेऊन आपण कुठे तरी ट्रेकिंग ला जाऊ अशी कल्पना सर्वांना सांगितली आणि ती सर्वांना लगेच आवडली. ट्रेकिंग ला जायचे तर ठरले पण कुठे जावे ते ठरत नव्हते; कोणाला जास्त चढाई नको होती तर कोणाला गर्दी नको होती. खूप विचार करून शेवटी मी घनगडाचे नाव सुचवले कारण हा किल्ला थोडासा आडवळणावर असल्यामुळे हौशी ट्रेकर्स सोडून जास्त कोणाला माहिती नाही आणि शिवाय किल्ल्याची मुख्य चढाई सुद्धा इतर किल्ल्यापेक्षा कमी आहे. सर्वांनी जास्त विचार न करता मी सुचवलेल्या नावावर शिक्कामोर्तब केले. २०१८ मध्ये ह्या किल्ल्याची चढाई मी आणि माझ्या कॉलेज च्या मित्रांनी केली होती त्या मुळे मला ह्या किल्ल्यावर चढाई चा प्रत्यक्ष अनुभव मला होता आणि ह्याच कारणामुळे ह्या मोहिमेचा म्होरक्या म्हणून माझी बिनविरोध निवड झाली !

ट्रेकिंग ला जाण्यासाठी १३ जुलै (वार शनिवार) 2024 ह्या दिवसाची निवड करण्यात आली पण जशी जशी तारीख जवळ येत गेली तशी सोबत येणाऱ्या लोकांची संख्या कमी होत गेली. शेवटी फक्त ८ जण शिल्लक राहिले होते मग आम्ही ४ गाड्या घेऊन जायचे ठरवले. ट्रिप ला जायच्या एक दिवस आधी सर्वांनी छोटीशी मीटिंग घेतली आणि त्यात लवकर जाऊन लवकर परत वापस येऊ असे ठरवले. सकाळी ठीक ७ वाजता हिंजवडी च्या मुख्य चौकात भेटायचं आणि तिथून सर्वांनी एकत्र निघायचं असे ठरले. 

शेवटी १३ जुलै चा दिवस उगवला, आम्ही पटकन आवरले आणि ठरल्या प्रमाणे हिंजवडी च्या मुख्य चौकात येऊन थांबलो. पण प्रत्येक ग्रुप मध्ये जसा एक जण आळशी मित्र असतो तसाच एक आळशी मित्र आमच्या हि ग्रुप मध्ये होता जो कि अजून आला नव्हता ! भाऊ फोन सायलेंट मोड वर ठेऊन मस्त पैकी झोपला होता; शेवटी सलग अर्धा तास फोन केल्यावर महाशय उठले आणि 'फक्त ५ मिनटात येतो !' असं म्हणून पुन्हा गायब झाले ! पुन्हा आमचा फोन-फोन चा खेळ सुरु झाला; प्रेत्येक वेळी एकच उत्तर ' आलोच ५ मिनटात !'. ह्या सगळ्यात आम्हाला निघायला चांगलाच उशीर झाला होता; ७ वाजता निघायचं नियोजन असताना आम्हाला निघण्यासाठी ९ वाजले होते. शेवटी भाऊ कसा-बसा ठरलेल्या ठिकाणी पोचला ! बाकीच्या मित्रांनी उशिरा आलेल्या मित्राला शिव्यांची लाखोळी वाहिली आणि आमच्या प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात झाली !  

पुणे ते किल्ले घनगड हे अंतर जवळपास ८५ कमी होते आणि त्या साठी जवळपास २-२:३० तास लागणार होते. घनगडावर जाण्यासाठी आम्ही मुळशी- ताम्हिणी- पिंपरी- भांबुर्डे - एकोले असा मार्ग निवडला होता. आम्ही जसे निघालो तशी लगेच पावसाला सुरुवात झाली पण त्याची तीव्रता जास्त नव्हती. जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असणाऱ्या शेतांवर प्रत्येक शेतकरी आप-आपली शेतीची कामे करण्यात रमला होता. मुळशी भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने बर्यापॆकी शेतकरी भाताची शेती करतात; अशाच एका शेतावर शेतीची रोपे लावणाऱ्या एका १०-१२ स्त्रियांच्या टोळीने आमचे लक्ष वेधले. रंगी-बेरंगी साड्यांवर पुरुषांचे खराब झालेलं सदरे त्यांनी घातले होते आणि बाहेरून पावसापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी जाड प्लास्टिक चे घोंगडे तयार करून घातले होते. भाताची रोपे लावणाऱ्या स्त्रियांपैकी बहुतेक जणी ह्या वयस्कर होत्या पण त्यांच्या हातातला चपळपणा हा २० वर्षाच्या मुलीलाही लाजवेल असा होता ! थोडा वेळ तिथे थांबून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.  हिंजवडी, घोटावडे, पिरंगुट अशी एक-एक गावे आम्ही मागे टाकत आम्ही मुळशी गाठले आणि ताम्हिणी घाटाच्या मुख्य चढाई ला सुरुवात केली; जसे आम्ही घाटावर आलो तसे आम्हाला मुळशी धरणाचे सुंदर असे दर्शन घडले. 

ताम्हिणी घाटाविषयी थोडक्यात माहिती: ताम्हिणी घाट हा पुण्याला कोकणाशी जोडणारया मुख्य घाटांपैकी एक आहे. ताम्हिणी  घाट हा महाराष्ट्रातल्या सर्वात सुंदर घाटांपैकी एक आहे असे मला वाटते; रस्त्याच्या एका बाजूला मुळशी धरणाचे बॅकवॉटर तर दुसऱ्या बाजूला उंच-उंच आणि सुंदर डोंगर लक्ष वेधून घेतात. वर्षाच्या १२ महिने ह्या घाटामध्ये वातावरण हे आल्हाददायक असते पण ताम्हिणी घाटाचे खरे सौन्दर्य हे पावसाळ्यामध्ये खुलून येते ! पावसाळ्यामध्ये ताम्हिणी घाटात अक्षरशः स्वर्ग उतरतो; धुक्यात हरवलेले डोंगर आणि त्यावरून कोसळणारे असंख्य धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी ताम्हणी घाट नक्कीच पाहावा !

आम्ही जसे-जसे पुढे जात होतो तसा पावसाचा जोर वाढत होता, पावसाचा जोर जरा जास्तच वाढल्याने एका छोट्याश्या हॉटेल जवळ आम्ही आमच्या गाड्या उभ्या केल्या, शिवाय सर्वांना भूक लागली होती त्यामुळे सर्वांनी नाश्ता तिथेच करायचे ठरवले. ज्या हॉटेल वार थांबलो होतो त्या हॉटेल ची सर्व्हिस एकदम संथ होती, त्या मुळे ऑर्डर येण्यासाठी वेळ लागत होता; त्यातच मित्रांनी ऑफिस च्या गोष्टी करायला सुरुवात केली. या सगळ्यात आमचा १ तास गेला आणि परत आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. जाताना खूप सारे छोटे-मोठे धबधबे कोसळत होते, छोटे-मोठे ओढे नाले दुथडी भरून वाहत होते. रस्त्याला लागूनच असलेल्या धबधब्यांवर काही पर्यटक  धबधब्याखाली उभे राहून अंघोळीचा आनंद लुटत होते. ताम्हिणी गावापासून थोडेसे पुढे गेल्यावर आम्हाला उजव्या बाजूला लोणावळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची पाटी दिसली आणि आम्ही तिकडे वळलो. ५-६ km चा घाट चढून पुढे आल्यावर आम्ही कुंडलिका दरी जवळ पोचलो. कुंडलिका दरी काळजाचा ठोका चुकवणारी एक अशी सुंदर पण तेव्हडीच खतरनाक दरी आहे. ही जागा खास करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हिरवाई, धबधबे आणि धुके यासाठी प्रसिद्ध आहे. येथे घनदाट जंगल, उंच डोंगर, खोल दर्‍या, आणि सह्याद्रीच्या रांगांचा अप्रतिम नजारा पाहायला मिळतो. दरी बघण्यासाठी आता २५० रुपये तिकीट आकारले जाते, दरीच्या पलीकडच्या भागाला अंधारबन चे जंगल असे म्हणतात. आम्ही इथे न थांबता पुढे निघण्याचा निर्णय घेतला कारण अजून आम्हाला खूप अंतर गाठायचे होते. 

कुंडलिका दरी आणि मागे दिसणारे अंधारबन चे जंगल 

कुंडलिका पासून थोडेसे पुढे आल्यावर आम्हाला पिंपरी हे गाव लागले. अलीकडच्या काळात अंधारबन चे जंगल चांगलेच प्रसिद्ध झाले आहे, जंगलाची सफर आपण २ भागात करू शकतो पहिली म्हणजे शॉर्ट ट्रेल जी कि ५ km ची आहे आणि दुसरी म्हणजे लॉन्ग ट्रायल जी जवळपास १८ km आहे. लॉन्ग ट्रेल पिंपरी गावापासून सुरु होते जी पुढे एकोले गावात संपते. पिंपरी हे गाव हे अंधारबन च्या जंगलात जाणयासाठी चा प्रवेशाचा मार्ग असल्याने तिथे रस्त्याच्या दुतर्फी छोट्या- मोठ्या गाड्या उभ्या होत्या. शनिवार हा बऱ्यापैकी लोकांसाठी सुट्टी चा दिवस असल्याने तिथे चांगलीच गर्दी जमली होती. पिंपरी गावापासून थोडेसे पुढे आल्यावर आम्हाला डाव्या बाजूला लोणावळ्याकडे जाणारा रस्ता दिसला आणि आम्ही तिकडे वळलो. इथून पुढचा रस्ता खूपच खराब होता त्या मुळे आमच्या गाड्यांची गती आपो अपच मंदावली; त्यात माझी तर स्कूटर असल्यामुळे मला गाडी चालवताना खूप अडचणी येत होत्या, यातच भर म्हणून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. ऎन पावसाळ्यात मला 'दुष्काळात १३ वा महिना !' या म्हणीची आठवण झाली. डोक्यावर हेल्मेट मध्ये डोळ्यांवर चष्मा आणि वरून कोसळणारा मुसळधार पाऊस या मुळे मला समोर च बघण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. त्या मुळे माझ्या सोबत असणाऱ्या गाड्या खूप पुढे निघून गेल्या आणि आम्ही माघे राहिलो. आमचा आणि बाकीच्यांचा संपर्क काही काळासाठी तुटला होता कारण आमच्या फोन ला तिथे रेंज नव्हती. ज्या गाड्या पुढे गेल्या होत्या त्यांना नेमके हे समजत नव्हते कि आम्ही नेमके पुढे गेलो कि मागे राहिलो. पुढे जाऊन भांबुर्डे हे गाव लागणार होते जिथून डाव्या बाजूला वळून एकोले गावाकडे जायचे होते. पुढे गेलेल्या मित्रांनी भांबुर्डे गावात आमची जवळपास १५-२० मिनिटे वाट बघितली पण अजून हि आम्ही आलो नाही म्हणून त्यांनी एका आजोबाला विचारले कि 'अकोले गावात जाताना तुम्हाला एक लाल रंगाची दिसली का? ' आजोबांनी त्याला होकारार्थी उत्तर दिले आणि सर्वांना असे वाटले कि आम्ही पुढे गेलो म्हणून त्या मुळे आमचे बाकीचे मित्र एकोले गावाकडे निघून गेले. काही वेळानी आम्ही भांबुर्डे गावात पोचलो पण आम्हाला आमचे बाकीचे मित्र दिसत नव्हते. बाकीचे मित्र सरळ पुढे तर नसतील ना गेले ह्या विचारात आम्ही पडलो कारण किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता फक्त मलाच माहिती होता. शेवटी काही वेळ थांबल्यावर आम्हाला तेच आजोबा भेटले जे आमच्या बाकीच्या मित्रांना भेटले होते. त्यांनी आम्हाला सांगितले कि तुमचे बाकीचे लोक पुढे गेलेत तेव्हा आम्हाला थोडसं हायसं वाटले आणि आम्ही एकोले गावाचा रस्ता पकडला. तिकडे आमचे बाकीचे मित्र एकोले गावात पोचले होते पण त्यांना आमची गाडी दिसत नव्हती. त्या मुळे सर्व जण चिंतेत सापडले होते; शेवटी आम्ही पण तिथे पोचलो आणि एकमेकांना बघून सर्वांचा जीव भांड्यात पडला ! ह्या सगळ्यात पावसाने मात्र रौद्र रूप धरण केले होते ; अशाच पावसात आम्ही प्रत्यक्ष चढाई ला सुरुवात केली.

किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती: घनगड हा मावळ प्रांतात एका आडबाजूला असलेला एक छोटेखानी किल्ला आहे जो कोकणातून वर येणाऱ्या घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कैदी ठेवण्यासाठी केला जात असे त्यामुळेच ह्या किल्ल्याला 'घाटवाटांचा रक्षक !' असे संभोधले जाते.  गडाची समुद्रसपाटी पासूनची उंची जवळपास ८४५ मीटर (२७७२ फूट) असली तरी पायथ्यापासून प्रत्यक्ष चढाई हि फक्त २६५ मीटर (८६९ foot) एव्हडीच आहे.

एकोले गावातून एक मळलेली पायवाट आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जाते. ह्याच मळलेल्या पायवाटेवरून आम्ही चालायला सुरुवात केली पण वरून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने हि पायवाट खूप निसरडी झाली होती. ह्याच पायवाटेवर आमच्या पैकी १-२ जण पाय घसरून पडले, त्यात माझाही समावेश होता ! पण ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेत आम्ही पुढे जात होतो. किल्यावर जाणारा संपूर्ण रस्ता हा गर्द झाडांनी व्यापला आहे त्या मुळे इथे सूर्य प्रकाशाला पोचण्यासाठी खूप कष्ट घयावे लागतात. आम्ही जाताना सर्व वाट हि धुक्यांनी व्यापली होती; वरून पाऊस आपली पूर्ण शक्ती पणाला लावून बरसत होता. १०-१५  मिनिटे चालत गेल्यावर आम्हाला एक वाट झाडीत जाताना दिसली, त्या वाटेने पुढे गेल्यावर आम्हाला पुरातन शिवपिंडीचे अवशेष दिसले, शिवलिंग हे सुस्थिती मध्ये होते आणि त्याची रोज पूजा होत असावी असे वाटले. मंदिर खूप भव्य दिव्य नसले तरी तिथे असलेलं शिवलिंग मात्र मनाला प्रचंड शांती आणि ऊर्जा देऊन जाते. मंदिरांच्या जवळच काही वीरगळ आणि तोफगोळे सुद्धा दिसले. दर्शन घेऊन आम्ही मुख्य वाटेवर आलो आणि थोडेसे चढून पुढे आल्यावर उजव्या बाजूला असलेल्या गारजाई देवी मंदिराजवळ येऊन पोचलो.देवीचे दर्शन घेतले आणि पुढच्या चढाई ला निघालो. इथूनच पुढे ५ मिनिटे चढून गेल्यावर आम्हाला किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसले आणि तिथून आम्ही किल्य्यावर प्रवेश केला. किल्ल्यावर प्रचंड धुके पसरले होते; २ फुटावर उभा असलेला माणूस सुद्धा दिसणे कठीण झाले होते, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कातळावरून पाणी प्रचंड वेगाने खाली जात होते. प्रवेशद्वारासमोर काही गुहा कोरलेल्या दिसल्या जिथे ४-५ जण राहू शकत होते. गुहेच्या उजव्या बाजूला एक बाजूला वरच्या कातळातून खाली निसटून आलेला एक भला मोठा खडक आम्हाला दिसला; हा खडक कातळाला रेलून तिरकस उभा असल्याने एक नैसर्गिक कमान तयार झाली आहे. आम्ही गेलो तेव्हा किल्ल्यावर प्रचंड धुके असल्यामुळे आम्हाला किल्ल्या भोवतीचा काहीच परिसर दिसत नव्हता पण जेव्हा आम्ही हा किल्ला हिवाळ्यात केला होता तेव्हा ह्या कमानीतून आम्हाला तैल-बैला किल्ला दिसला होता. सतत सुरु असलेल्या पावसामुळे काही जण चांगलेच गारठले होते त्या मुळे काही जण गुहेत जाऊन बसले. गुहेच्या पुढे आल्यावर एका उभ्या कड्यावर लावलेली लोखंडी शिडी दिसली ती चढून आम्ही वार आलो. ह्या आधी इथे पायऱ्या होत्या पण त्या इंग्रजांनी नष्ट केल्या असे नंतर केलेल्या वाचनात आले. ह्या वेळी फक्त आम्ही ३ जण वार आलो होतो कारण शिडी वरून चढणे थोडेसे धोकादायक वाटत होते आणि तसे बघायला गेले तर ते धोकादायकही होते. शिडी चढून वार आल्यावर पाण्याचे टाके दिसले. पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य दिसत होते पण त्यात काही जणांनी त्यात प्लास्टिक बाटल्या टाकून त्यांची लायकी दाखवली होती. तिथून पुढे आम्हाला एक कातळात कोरलेली एक पायवाट दिसली; त्या पायवाटेनं पुढे गेल्यावर आम्ही घनगड आणि बाजूचा डोंगर या मधल्या खिंडीच्या वरच्या भागात पोचलो. आम्ही ज्या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी प्रचंड मोठे वारे दरीतून वर येत होते.  त्या वाऱ्याने आम्ही अक्षरशः मागे ढकलले जात होतो. धुक्यामुळे दरी किती खोल आहे हे दिसत नसले तरी मी आधी काही वर्षांपूर्वी हिवाळयात भेट दिली होती त्यामुळे ती दरी किती खोल आणि खतरनाक होती त्याची मला पूर्ण कल्पना होती.


धुक्यात हरवलेला घनगड(तारीख १३ जुलै 2024) 

 शिडी चढून वर आल्यावर सुद्धा आम्हाला काही गुहा दिसल्या ज्या पहारेकर्यांच्या विश्रांतीसाठी बनवल्या होत्या. खिंड बघून आम्ही वापस शिडी जवळ आलो तिथून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी १५-२० पायऱ्या दिसल्या पण ह्या पायऱ्या सरळ नव्हत्या आणि चढाई सुद्धा खडी होती. हि चढाई करण्यासाठी 'शिवाजी ट्रेल' ह्या संस्थेने लोखंडाच्या तारा बसवल्या आहेत. वर येण्यासाठी लोखंडी शिडी सुद्धा ह्याच संस्थेने बसवली आहे. अशा खराब वातावरणात आम्ही किल्ल्याच्या माथ्यावर जावे कि राहू द्यावे असा विचार करू लागलो पण तेव्हड्यात आम्हाला एक मध्यम आकाराचा दगड वरून खाली येताना दिसला आणि आम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला निसर्गानेच दिले ! अशा खराब वातावरणात नको ते धाडस जीवावर बेतू शकते हे आम्हाला समजले होते त्या मुळे आम्ही वर न जाण्याचा निर्णय घेतला. थोडा वेळ आम्ही तिथेच असलेल्या गुहेत शांत पाने बसून बसलो. समोर चा दिसणारा निसर्ग बघून आम्ही निशब्द झालो होतो. गुहेत बसून मी माझे डोळे बंद केले; जसे डोळे बंद केले तसे रोजच्या दैनंदिन आयुष्यात पडणारे प्रश्न अचानक नाहीसे झाले होते तर काही प्रश्नाची उत्तरे आपो आप भेटली होती. काही वेळानी डोळे उघडले आणि माझी नजर एक बुरुजावर गेली;  बुरुजाकडे बघून मला शिवाजी महाराजांचा काळ आठवला, इतक्या कठीण आणि हालाकीच्या परिस्थितीत महाराजांनी आणि त्यांच्या असंख्य अशा वीर मावळ्यांनी हे स्वराज्य कसे उभे केले असेल ह्या विचारांनी मन थक्क झाले ! आपण सध्या जगात असलेलं ऐशो आरामच जीवन हे मावळ्यांनी दिलेल्या बलिदानामुळे जगत आहोत ह्या गोष्टीची जाणीव झाली. थोडा वेळ तसंच बसून राहिल्यावर मित्राने खाली निघण्याची सूचना केली आणि आम्ही शिडी उतरून खाली असलेल्या मित्रांना येऊन मिळालो. खाली असलेल्या मित्रांनी आम्हाला विचारलं 'एवढा वेळ वर काय करत होतात?' पण त्याचं उत्तर आम्हा तिघांपैकी कोणालाही देता आलं नाही. आठवणी म्हणून आम्ही २-४ ग्रुप फोटो काढले आणि आम्ही गड उतरायला घेतला पण मन भरले नव्हते ! पण कुठल्याही प्रवासाला शेवट हा असतोच ! जड अंतःकरणाने एक नजर किल्ल्याकडे फिरवली आणि गड उतरायला घेतला. २०-२५ मिनिटात आम्ही गड उतरला आणि परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासात आम्हाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पुण्यात पोचण्यासाठी आम्हाला जवळपास ३-४ तास लागले. संध्याकाळी ६ वाजता आम्ही पुण्याच्या वेशीवर येऊन म्हणजेच हिंजवडी मध्ये येऊन पोचलो आणि तिथेच २ तास ट्रॅफिक मध्ये अडकलो. ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर जे प्रश्न किल्ल्यावर येऊन अचानक गायब झाले होते ते आता पुन्हा मनामध्ये पडायला आले होते पण या वेळेस एक फरक होता कि पडलेल्या प्रश्नाची उत्तरे कशी लिहायची याचे गमक मला समजले होते ! प्रत्यक्ष घरी पोचायला मला संध्याकाळचे ८ वाजले. पण शरीर जरी गडावरून खाली आले असले तरी मन मात्र किल्ल्यावरच होते, आहे आणि उद्याही राहिलंच ! ....समाप्त .

२०१९ साली हिवाळ्यात काढलेले काही जुने फोटो टाकत आहे (सर्व फोटो मी माझ्या मोबाईल च्या कॅमेरा मधून स्वतः काढले आहेत)

नैसर्गिक कमान


बालेकिल्ल्यावरून दिसणारा एकोले दरी चा परिसर आणि तैलबैला किल्ला